महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौऱ्यांचे नाटक कधी थांबणार?-एस.एम.देशमुख


पावसाळा आला, गणपती आले की मंत्र्यांचे मुंबई-गोवा महामार्गाचे पाहणी दौरे सुरू होतात. मंत्री भरत गोगावले हे रायगडचे. महाडमध्ये राहतात. महाड-मुंबई दरम्यान ते हजारो वेळा ये-जा करतात. तरीही त्यांनी आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. गणपतीपूर्वी माणगाव बायपासची एक लेन सुरू करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

म्हणजे काम पूर्ण झालेले नाही, हे मंत्री महोदय मान्य करतात. तरीही टोल कसा सुरू झाला, यावर त्यांनी भाष्य केले नाही. टोलच्या मुद्द्यावर सारेच मौन पाळतात, हे विशेष.

ते असो. आज भरत गोगावले यांनी पाहणी केली. काही दिवसांत रायगडचे खासदार पाहणी करतील. मग बांधकाम मंत्री पाहणी करतील. त्यानंतर मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील फेरफटका मारतील. हे गेली १४ वर्षे सुरू आहे.

रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री असताना त्यांनी सात वेळा महामार्गाची पाहणी केली होती.
कशासाठी ही नाटके केली जातात? पाहणी दौऱ्यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यापेक्षा रस्ता लवकर पूर्ण होईल, या दृष्टीने ही मंडळी प्रयत्न का करीत नाहीत?

जनता सरकारच्या तोंडात शेण घालत आहे, तरी ही मंत्री पाहणी दौरे करतात आणि नवीन तारखा जाहीर करतात. याशिवाय काहीच होत नाही. भरत गोगावले यांचा आजचा दौरा देखील याच पद्धतीचा आहे.

कोणी काहीही केले तरी डिसेंबर २०२६ पर्यंत हा रस्ता पूर्ण होत नाही. गणपतीला जाताना यंदाही भक्तांना खड्डे, अपूर्ण कामे आणि वाहतूक कोंडीचा सामना करीतच प्रवास करावा लागेल, हे नक्की.

(एस. एम. देशमुख हे मुंबई मराठी पत्रकार परिषदचे प्रमुख व मुख्य विश्वस्त आहेत.)


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *