महाराष्ट्र

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर


२२ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे वितरण

मुंबई-(प्रतिनिधी)अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ हे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील रॉयल गार्डन येथे होणार आहे.

ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार संघांनी उत्कृष्ट पत्रकारितेसोबतच सामाजिक उपक्रमांद्वारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी परभणी जिल्हा पत्रकार संघास पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जाहीर झाला आहे.

वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारासाठी नागपूर, नाशिक, कोंकण, पुणे, लातूर, संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर व मुंबई विभागांतील एकूण दहा तालुका व महानगर पत्रकार संघांची निवड करण्यात आली आहे. विशेषबाब म्हणजे यंदा विदर्भ विभागातून दोन तालुका पत्रकार संघांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

या सोहळ्यात मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ प्रदान करण्यात येणार असून, हे पुरस्कार राज्यातील पत्रकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे,कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, कोकण विभागीय सचिव मनोज खांबे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय मोहिते, दर्वेश पालकर आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *