ताज्या घडामोडी

हशू अडवाणी स्मशानभूमीतील (चरई स्मशान भूमि) शीत शवागार दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी


मुंबई -चेंबूर येथील स्वर्गीय हशू अडवाणी हिंदू स्मशानभूमीत (चरई स्मशान भूमि)कोविड काळात उभारण्यात आलेले शीत शवागार मशिन (Mortuary) सध्या नादुरुस्त अवस्थेत पडून असून वापरात नसल्याने ते पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी माजी नगरसेविका आणि सुधार समिती सदस्या आशाताई सुभाष मराठे यांनी केली आहे.

कोविड महामारीच्या काळात रुग्णालयांची क्षमता संपल्यानंतर मृतदेह ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये ४ ते ६ प्रेते ठेवण्याची क्षमता असलेली शवागारे कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारली होती. मात्र सध्या अशी अनेक शवागारे निष्क्रिय स्थितीत धुळखात पडलेली असून नादुरुस्त झाल्याने त्यांचा उपयोग होत नाही. त्यामुळे महापालिकेचा मोठ्या प्रमाणावर निधी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर आशाताई मराठे यांनी एम/पश्चिम विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे निवेदन सादर करून, स्वर्गीय हशू अडवाणी स्मशानभूमीतील शवागार मशिन तातडीने दुरुस्त करून रंगरंगोटी सहित पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. तसेच, तेथील वापराची आवश्यकता नसेल तर हे शवागार जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात हलविण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशीही सूचना त्यांनी केली आहे.

स्थानिक नागरिकांनीही या मागणीस पाठिंबा दर्शवित, मृतदेह व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या सुविधेचा योग्य वापर होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. महापालिकेने यावर तातडीने कारवाई करून संबंधित शवागार पुन्हा वापरात आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *